फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वादाला नवे वळण; सोशल मीडियावर व्हायरल कथित सुसाईड नोट प्रकरण

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्याशी झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित सुसाईड नोट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी घटनाक्रम स्पष्ट करत, संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले आहे.

डॉ. मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दिवशी प्रदीप कोंडे-देशमुख हे उपजिल्हा रुग्णालयात गन लायसन्ससाठी आवश्यक असलेले शारीरिक (Physical) व मानसिक (Mental) फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी आले होते. सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचा डॉ. मदने यांना फोन आला. फोनवर त्यांनी स्वतःला माजी मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे सांगत फिटनेस प्रमाणपत्रावर सही व शिक्का आवश्यक असल्याचे सांगितले.त्यानंतर प्रदीप कोंडे-देशमुख प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालयात आले.

त्यांच्या समवेत सुरक्षा रक्षक (बॉडीगार्ड) असल्याचेही डॉ. मदने यांनी सांगितले. त्यांनी गन परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह डॉ. खराडे यांचे मानसिक फिटनेस प्रमाणपत्र सादर केले आणि अंतिम प्रमाणपत्राची मागणी केली.याचवेळी प्रदीप कोंडे-देशमुख यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्याबाबत तक्रार केली. त्यानंतर डॉ. मदने यांनी डॉ. रुपनवर यांना आपल्या कार्यालयात बोलावले. कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान प्रदीप कोंडे-देशमुख आणि डॉ. रुपनवर यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून कोंडे-देशमुख यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केल्याचे डॉ. मदने यांनी सांगितले.

घटनेनंतर संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी आपल्या पदाचा राजीनामा डॉ. मदने यांच्याकडे सादर केला. मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. त्याऐवजी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव (सातारा) यांच्या कार्यालयात जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ते तेथे हजर झाले नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, त्याच दिवशी दुपारी डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर कथित आत्महत्येची नोट व दुपारी 2 वाजता आत्महत्या करणार असल्याचा संदेश प्रसारित केला. या संदेशानंतर वैद्यकीय प्रशासनासह पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली.

सोशल मीडियावरील पोस्टनंतर पोलिसांची तातडीने हालचाल

डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर कथित सुसाईड नोट लिहिल्याची माहिती मिळताच डॉ. लिला मदने यांनी तातडीने फलटण शहर पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे डॉ. रुपनवर सुरक्षित असल्याची खात्री केली. त्यानंतर ते आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयात आल्याची माहितीही डॉ. मदने यांनी दिली.

प्रमाणपत्रावरील पत्त्यावरून चर्चेला उधाण

प्रदीप कोंडे-देशमुख यांना देण्यात आलेल्या फिटनेस प्रमाणपत्रावरील कागदपत्रांमध्ये त्यांचा पत्ता कुसूर (ता. फलटण) असा नमूद असल्याचे दिसते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ते मूळचे खेड शिवापूर (जि. पुणे) येथील असल्याची चर्चा आहे. या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

फिटनेस प्रमाणपत्रासाठी फलटणचीच निवड

परजिल्ह्यातील काही व्यक्ती फलटण तालुक्यात भाडेकरार करून स्थानिक रहिवासी असल्याचे दाखवत गन लायसन्ससाठी आवश्यक फिटनेस प्रमाणपत्र घेत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचा खुलासा

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, संबंधित प्रदीप कोंडे-देशमुख यांचा कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी स्वतःला विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून संबोधल्याचा दावा केला असला, तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत नियुक्ती नसल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

डॉ. रुपनवर कार्यमुक्त

उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या वादानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांनी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या वर्तणुकीबाबत आक्षेप नोंदवत त्यांना उपजिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त केल्याचे सांगितले. या निर्णयानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

महिला डॉक्टरसाठी महाराष्ट्र धावला, पण पुरुष डॉक्टरसाठी कोण?

‘या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी, “महिला डॉक्टरच्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला, मात्र पीडित असल्याचा दावा करणाऱ्या पुरुष डॉक्टरसाठी कोणीही बोलत नाही,” अशी भावना व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!