अनधिकृत केबल हटविण्याची कारवाई होणारच; नियमांचे उल्लंघन सहन करणार नाही – महावितरणचा इशारा
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
फलटण शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी टीव्ही केबल व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बुधवारी पूर्णपणे ठप्प झाल्याने हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महावितरण कंपनीने वीज वितरणाच्या खांबांवर अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या खाजगी टीव्ही केबल व इंटरनेट फायबर केबल्सविरोधात कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक केबल ऑपरेटर व इंटरनेट सेवा पुरवठादारांनी ५ ऑगस्टपासून सेवा बंद ठेवली. त्यामुळे शहरातील केबल टीव्ही, ब्रॉडबँड आणि फायबर इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
महावितरणने दोन दिवसांपूर्वीच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे तसेच केबल टीव्ही व इंटरनेट सेवा पुरवठादारांना नोटिसा बजावत वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधितांनी स्वतःहून केबल्स काढून न घेतल्यास महावितरणकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते.यानंतर अनेक केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांनी महावितरणच्या कारवाईमुळे नेटवर्क विस्कळीत होणार असल्याचे कारण देत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली.
परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये केबल टीव्ही प्रसारण पूर्णपणे बंद झाले असून ब्रॉडबँड व फायबर इंटरनेट सेवा देखील ठप्प झाल्या आहेत.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वीज वितरणाच्या खांबांवर कोणत्याही प्रकारच्या खाजगी केबल्स परवानगीशिवाय टाकण्यास मनाई आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून केबल्स टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होतात. तसेच शॉर्टसर्किट, अपघात आणि जीवितहानीचा धोका वाढत असल्याने ही कारवाई सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अचानक इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेले व्यापारी, बँका, ई-सेवा केंद्रे, खासगी कार्यालये, उद्योग तसेच घरातून काम करणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. अनेक व्यापाऱ्यांचे यूपीआय व्यवहार अडकल्याने आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांनी योग्य समन्वय न साधता कारवाई करण्यात येत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र महावितरण कंपनी आपल्या भूमिकेवर ठाम असून वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवण्यात येणार नाहीत आणि नियमांनुसार कारवाई सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.या घडामोडींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे सुरक्षिततेसाठी महावितरणची कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असताना, दुसरीकडे पर्यायी व्यवस्था न करता सेवा बंद केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी गैरसोय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे संबंधित केबल ऑपरेटर, इंटरनेट सेवा पुरवठादार आणि महावितरण यांनी तातडीने समन्वय साधून सेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.महावितरणने शहरासह ग्रामीण भागातील वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटविण्याची मोहीम पुढील काही दिवसही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी असा आरोप केला की, महावितरणवर दबाव आणण्यासाठी काही केबल ऑपरेटर व इंटरनेट सेवा पुरवठादारांनी जाणीवपूर्वक सेवा बंद ठेवली आहे. ग्राहकांना कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देता सेवा बंद ठेवणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे शासकीय, निमशासकीय, बँकिंग, शैक्षणिक आणि व्यावसायिक सेवा विस्कळीत झाल्या असून ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी तातडीने तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

