‘स्वस्त राजकारणाऐवजी सत्याने वागण्याचे धैर्य दाखवा’; अनिकेतराजेंचा रणजितसिंहांना टोला

रामराजेंच्या पाठराखणीसाठी अनिकेतराजे मैदानात; सोशल मीडिया पोस्टमधून राजकीय संघर्षाला नवे वळण

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अनिकेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या पोस्टमधून त्यांनी रामराजेंच्या राजकीय कारकिर्दीतील योगदान, जनतेशी असलेले नाते आणि फलटणच्या संस्कारांचा दाखला देत त्यांची पाठराखण केली आहे. अनिकेतराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी छत्रपती सईबाईसाहेब यांच्या माहेरच्या श्रीमंत नाईक-निंबाळकर राजघराण्याच्या वारशाचा उल्लेख केला आहे.

हा वारसा केवळ नावापुरता नसून शतकानुशतके चालत आलेली संस्कृती, परंपरा, कर्तव्य आणि जनतेच्या विश्वासाची ओळख असल्याचे त्यांनी म्हटले आहे.‘राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र इतिहास, संस्कार आणि ज्येष्ठांचा सन्मान यांची पातळी सोडून स्वस्त राजकारण करणे ही अपरिपक्वता आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.याचबरोबर रात्री-बेरात्री शहरातून स्टंटबाजी करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा सत्याने वागण्याचे धैर्य दाखवावे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लगावला आहे.

‘३५ वर्षांचा जनतेचा विश्वास आरोपांनी कमी होणार नाही’रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण संस्थानच्या राजघराण्याचा वारसा जपत महाराष्ट्रातील सर्वोच्च संवैधानिक पद भूषविले असून, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचा दावा अनिकेतराजे यांनी केला आहे.

३५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रामराजेंनी जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास हा विरोध, विपर्यास किंवा स्वस्त राजकारणामुळे कमी होणार नाही, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.‘जनतेचा विश्वास चिरंतन’आपली भूमिका स्पष्ट करताना युवराज अनिकेतराजे यांनी, “राजकीय वादळे क्षणभंगुर असतात; मात्र नाईक-निंबाळकर राजघराण्याने पिढ्यानपिढ्या कमावलेला जनतेचा विश्वास हा फलटणच्या मातीतल्या संस्कारांप्रमाणे चिरंतन आहे,” असा संदेश दिला आहे.

दरम्यान, अनिकेतराजे यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रामराजे नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे फलटणच्या राजकारणातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आगामी काळात या राजकीय संघर्षाला कोणते नवे वळण मिळते आणि विरोधकांकडून यावर काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!