महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी :बारामती तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराचे अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, या घटनेने संपूर्ण फलटण-बारामती परिसरात संतापाची लाट उसळली आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण दडपण्यासाठी तिचा फलटण तालुक्यातील एका डॉक्टरने कथित गर्भपात केल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
नात्याचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या नात्यातीलच असल्याचे समजते. नात्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अवघ्या 12 ते 13 वर्षांच्या या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्यंत लहान वयात या मुलीला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. आरोपीने धमकावून तिला गप्प ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.
गर्भधारणा आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
या सततच्या अत्याचारातून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याचे स्पष्ट झाले. ही बाब उघड झाल्यानंतर आरोपीने प्रकरण दडपण्यासाठी हालचाली केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच अनुषंगाने मुलीला फलटण तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून तिचा गर्भपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गर्भपातामुळे प्रकरण उघडकीस
गर्भपाताच्या घटनेनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणामुळे केवळ अत्याचारच नव्हे, तर वैद्यकीय नियमांचे संभाव्य उल्लंघनही समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचा गर्भपात करताना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संतप्त नागरिकांचा उद्रेक, आरोपीला पोलीसांच्या स्वाधीन
ही घटना समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने आरोपीला पकडून त्याला मारहाण केल्याची माहिती मिळते. त्यानंतर आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलीस तपास युद्धपातळीवर
या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची पुढील चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
डॉक्टरच्या भूमिकेवर संशय
या प्रकरणातील सर्वात संवेदनशील आणि गंभीर मुद्दा म्हणजे अल्पवयीन मुलीचा कथित गर्भपात. फलटण तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने आर्थिक फायद्यासाठी किंवा अन्य कारणांमुळे कायद्याचे उल्लंघन करून हा गर्भपात केला का, याची चौकशी सुरू आहे.स्थानिक नागरिक व नातेवाईकांकडून संबंधित डॉक्टरवरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
अवैध गर्भपात प्रकरणांमुळे फलटण पुन्हा चर्चेत
फलटण तालुका यापूर्वीही अवैध लिंगनिश्चिती आणि गर्भपात प्रकरणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या नव्या घटनेमुळे प्रशासनावर अधिक दबाव निर्माण झाला आहे. या प्रकरणातून अशा प्रकारचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास करण्याची मागणी होत आहे.कठोर कारवाईची मागणीया घटनेनंतर विविध सामाजिक संघटना, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. फलटण तालुक्यातील संबंधित डॉक्टरवर यापूर्वीही अनेक आरोप झाले असून प्रत्येक वेळी तो डॉक्टर अशा प्रकरणातून सुटत असल्याने संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याच प्रकारे अनेक अल्पवयीन मुलींचे या ठिकाणी गर्भपात केल्याचे नाकारता येत नसल्याची बाब सामाजिक संघटना व नागरिक यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित डॉक्टरला कठोर शिक्षा द्यावी
संबंधित फलटण तालुक्यातील त्या डॉक्टरची व रुग्णालयाची चौकशी करून आवश्यक असल्यास परवाना रद्द करावा. दोषी आढळणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशा मागण्या पुढे येत आहेत. फलटण तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे फलटण तालुका महाराष्ट्रात चर्चेत येत असून अशा अनधिकृत गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला फलटण तालुक्यातून तडीपार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीसांचे आवाहन
पोलीसांनी या प्रकरणी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि अफवा पसरवू नयेत, तसेच अल्पवयीन पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याचे आवाहन केले आहे.

