महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी | ३० जून २०२६
फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसह शहरातील विविध विकासकामांशी संबंधित एकूण २१ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील ‘रामराजे उद्यान’ या उद्यानाच्या नामांतराचा ठरला. उद्यानाचे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ करण्याचा प्रस्ताव अशोक जाधव यांनी मांडला. या प्रस्तावाचे वाचन सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी केले, तर किरण राऊत यांनी अनुमोदन दिले.चर्चेदरम्यान ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी उद्यानाला माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची सूचना केली. त्यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी, कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने आधीच खाजगी संस्थांचे नामकरण झाले असल्याने शासकीय उद्यानाला ‘संत सगुणामाता उद्यान’ हेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर सभेने संबंधित प्रस्तावास मान्यता दिली.
सभेत शहरातील अतिक्रमणाचा मुद्दाही गाजला. नगरसेवक पंकज पवार यांनी हा विषय उपस्थित करत प्रभावी कारवाईची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला गती देण्याचे निर्देश देत पुढील सभेपूर्वी ठोस कार्यवाही करण्याचा इशारा दिला.मोकळ्या खासगी भूखंडांच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवक विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संबंधित भूखंड मालकांना नोटिसा बजावण्यात येतील, स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वच्छता करून त्याचा खर्च संबंधित मालकांच्या मालमत्ता करात समाविष्ट करेल, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरही सभागृहात चर्चा झाली.तसेच आगामी आषाढी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारी, हिरकणी कक्ष, स्वच्छता मोहीम आणि इतर आवश्यक सुविधांसह वारीसंदर्भातील १९ कामांना मंजुरी देण्यात आली.
याशिवाय, शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या उभारणीच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान येथे निवारा शेड उभारणे, कुरेशी नगरमधील विकासकामे तसेच शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेलाही मंजुरी देण्यात आली.
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील जुन्या हातपंपांची दुरुस्ती, नवीन बोअरवेल मंजूर करणे, गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे तसेच काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
या विशेष सभेत शहर विकास, मूलभूत सुविधा आणि पालखी सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

