पालखी सोहळ्यापूर्वी फलटण नगरपरिषदेची तयारी; मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला वेग

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. ३ जुलै : आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेने मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची (नसबंदी) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे वारकरी तसेच शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगरपरिषदेने शहरातील कचरा डेपो परिसरात निर्बीजीकरणासाठी सुसज्ज केंद्र उभारले असून, येथे एकाच वेळी सुमारे ५० ते १०० कुत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कुत्र्यासाठी स्वतंत्र निवारा, स्वच्छतेची योग्य काळजी तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या केंद्रात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कुत्र्यांवर उपचार केले जात असून, निर्बीजीकरणासोबतच रेबीज प्रतिबंधक लसीकरण देखील केले जात आहे.

त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित होण्यासोबतच रेबीजचा धोका कमी करण्यासही मदत होणार आहे.नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम केवळ पालखी सोहळ्यापुरती मर्यादित न ठेवता पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये

– पालखी सोहळ्यापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची विशेष मोहीम.

– कचरा डेपो येथे ५० ते १०० कुत्र्यांची क्षमता असलेले सुसज्ज केंद्र.

– प्रत्येक कुत्र्यासाठी स्वतंत्र निवारा व स्वच्छतेची व्यवस्था.

– पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण.

– पालखी सोहळ्यानंतरही मोहीम सुरू ठेवण्याचा नगरपरिषदेचा निर्णय.

error: Content is protected !!