संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; विमानतळ पालखी तळ ते जिंती नाका मार्गाची सविस्तर पाहणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. ३ जुलै : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुविधायुक्त व्हावा, यासाठी फलटण शहरातील विमानतळ पालखी तळ ते जिंती नाका या महत्त्वाच्या पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध कामांचे नियोजन करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, तात्पुरत्या दुरुस्त्या, अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थापन तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामादरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देत कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल भैय्या निंबाळकर, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, नगरसेवक रोहित नागटिळे, फलटण नगरपरिषदेचे बांधकाम विभाग प्रमुख (नगर अभियंता) आर. डी. गायकवाड, शिवसमर्थ कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक प्रफुल्ल पाटील, दीपक देशमुख आणि श्रीवल्लभ हेंद्रे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान पालखी मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची व्यवस्था, वैद्यकीय पथके, आपत्कालीन सेवा, कचरा व्यवस्थापन आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पालखी मार्गावरील प्रत्येक आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

error: Content is protected !!