महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : माऊली फाउंडेशन व नगरसेविका कुमारी सिद्धली अनुप शहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एसटी बससाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्ड कॅम्पला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याबाबतची माहिती कुमारी सिद्धली अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना, एसटी बस स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागू नये, या उद्देशाने हा कॅम्प त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे वॉर्डमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.या कॅम्पमध्ये सुमारे ८०० महिलांनी सहभाग घेत स्मार्ट कार्ड काढून घेतले.
अल्पावधीत मोठ्या संख्येने महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आयोजकांना यश आले. कॅम्पचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने प्रक्रिया जलद व सुरळीत पार पडली.सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या सिद्धली शहा यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांना प्रवासासाठी आवश्यक असलेले स्मार्ट कार्ड सहज उपलब्ध झाले.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे नियोजन करण्यात आले होते. कॅम्प यशस्वी करण्यासाठी माऊली फाउंडेशनच्या सर्व विश्वस्तांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

