
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, यापूर्वी कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत २० एप्रिल २०२६ होती. मात्र, पालकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच काही तांत्रिक कारणांचा विचार करून ही मुदत २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान वाढविण्यात आली आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत लॉटरीद्वारे निवड झालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या वाढीव कालावधीत आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.दरम्यान, वाढीव मुदतीच्या पार्श्वभूमीवर आरटीई पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश एनआयसी, पुणे यांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे अनेक पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, ज्यांचे प्रवेश अद्याप प्रलंबित आहेत त्यांनी ३० एप्रिलपूर्वी कागदपत्र पडताळणी पूर्ण करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

