कारवाई उधळण्याचा प्रयत्न; जेसीबी पलटी, बिगर क्रमांकाचा टिपर घेऊन चालक फरार
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
दिनांक २२ जुलै २०२६
फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर थेट जेसीबी चालवून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) रात्री घडली. या हल्ल्यात शासकीय स्कॉर्पिओ वाहनाचे नुकसान झाले असून, कारवाई हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महसूल विभागाचे वाहनचालक बाळासाहेब पांडुरंग भिसे (वय ४४, रा. गिरवी नाका, फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे भरारी पथक तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात छापा टाकण्यासाठी गेले होते.कारवाईदरम्यान तानाजी शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा) याच्या सांगण्यावरून जेसीबीच्या सहाय्याने धरणातील माती बिगर क्रमांकाच्या टिपरमध्ये भरून चोरी सुरू असल्याचे पथकाला आढळून आले.
महसूल विभागाने कारवाई सुरू करताच जेसीबी चालकाने थेट शासकीय स्कॉर्पिओवर जेसीबीची फरांडी आदळून वाहनाचे नुकसान केले. त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात जेसीबी पलटी झाली. मात्र, बिगर क्रमांकाचा टिपर घेऊन दुसरा चालक फरार होण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणी तानाजी शेळके तसेच जेसीबी आणि टिपरवरील अज्ञात चालकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांन्वये लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे फलटण तालुक्यात गौण खनिज माफियांची वाढती मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
महसूल विभागाच्या पथकावरच हल्ला करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न होत असल्याने या अवैध व्यवसायामागे कोणाचे संरक्षण आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. जगताप करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गौण खनिज चोरी करणाऱ्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

