बेशुद्ध महिला वारकरीला उपचार नाकारल्याचा आरोप; समाजसेवक सचिन गानबोटे यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

लाईफ लाईन रुग्णालयाविरोधात संताप; डॉ. जे. टी. पोळ यांच्या तातडीच्या उपचारांमुळे महिला वारकरीला जीवदान

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान नातेपुते येथे घसरून गंभीर जखमी झालेल्या एका महिला वारकरीला उपचारासाठी नेल्यानंतर खासगी रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, समाजसेवक सचिन गानबोटे यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि डॉ. जे. टी. पोळ यांच्या तातडीच्या उपचारांमुळे संबंधित महिला वारकरीचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास समाजसेवक सचिन गानबोटे हे रिंगरोड परिसरातून जात असताना त्यांना एक रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसले. चौकशी केली असता, त्या रुग्णवाहिकेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या मागील दिंडी क्रमांक २ मधील उषा रमेश जठार (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा) या महिला वारकरी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजले. नातेपुते येथे घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

महिला वारकरी रुग्णास तत्काळ उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका फलटण येथे आली होती. यावेळी रुग्णवाहिका चालकाने लाईफ लाईन रुग्णालयाचा पत्ता विचारल्याने सचिन गानबोटे यांनी त्याला तात्काळ मार्ग दाखवला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. मात्र काही वेळानंतर त्याच परिसरात तीच रुग्णवाहिका पुन्हा दिसल्याने त्यांनी चौकशी केली. त्यावेळी रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी सांगितले की, लाईफ लाईन रुग्णालयात महिला वारकरीला उपचारासाठी नेले असता “रुग्णवाहिका मधील कर्मचाऱ्यांनी महिलेवर उपचार करा” अशी विनंती केली असता तेथील डॉ. पलाश कांबळे यांनी रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. “इथे थांबू नका, बाहेर घेऊन जा, बाहेर जाऊन कालवा करा ” अशा शब्दांत रुग्णाला परत पाठविण्यात आल्याचा आरोप रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी केला.

ही माहिती मिळताच सचिन गानबोटे यांनी कोणताही विलंब न करता रुग्णवाहिका थेट जे. टी. हॉस्पिटलकडे वळवली. त्यांनी तत्काळ डॉ. जे. टी. पोळ यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची गंभीर परिस्थिती सांगितली. रुग्णालयात पोहोचताच डॉ. पोळ यांनी महिला वारकरीची तपासणी केली. डोक्याला गंभीर मार लागल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार महिला वारकरीला जवळील सीटी स्कॅन केंद्रात नेऊन तपासणी करण्यात आली. अहवालात डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना जे. टी. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे संबंधित महिला वारकरीचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गंभीर अवस्थेतील वारकरीला उपचार नाकारल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयातील डॉ. पलाश कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, “त्या वेळी रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता,” असे त्यांनी सांगितले. मात्र, रुग्णवाहिका सेवकांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात बेड उपलब्ध असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करावी, डॉ. पलाश कांबळे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वारकरी वर्गातून होत आहे.

प्रशासनाची तत्परता कुठे गेली ?

गंभीर जखमी महिला वारकरीला तातडीने उपचार मिळावेत यासाठी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल फोन बंद होता. त्यानंतर तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनीही फोन उचलला नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तत्परता दिसून आली नसल्याची नाराजी वारकरी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चौकशी करून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जाऊ शकते. त्यासाठी त्वरित नकार दिला जाऊ शकत नाही. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यापूर्वी दिले आहेत असे असताना डॉ.पलेश कांबळे या डॉक्टरने कोणत्या कारणाने महिला वारकरी रुग्णास लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करून घेतले नाही याची चौकशी करण्यात यावी व डॉ.पलाश कांबळे या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

error: Content is protected !!