फलटणमध्ये ५६ वा अंतरधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न; समतेचा संदेश अधोरेखित

फलटण प्रतिनिधी| महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | दि. ५ मे २०२६

फलटणमध्ये फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या प्रेरणेतून ५६ वा अंतरधर्मीय सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. “सत्यशोधक विवाह हा सत्य, समता आणि मानवतेवर आधारित असल्याने सर्व जाती-धर्मांनी त्याचे अनुकरण करावे,” असे प्रतिपादन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी यावेळी केले.फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात प्रा. अॅड. करिष्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांचा मोफत अंतरधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अक्षत रेसिडेन्सी, जाधववाडी येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मोजक्या नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विवाहाची अधिकृत नोंदणी करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत विधी पार पाडण्यात आले.

यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते नवदांपत्याला विवाह प्रमाणपत्र तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली.कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले रचित मंगलाष्टकांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक अक्षतांच्या ऐवजी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सोहळ्याला वेगळेपणा देण्यात आला.

विवाहाची सुरुवात नवदांपत्याने भारतीय राज्यघटना आणि समग्र वाङ्मय हातात घेऊन आगमनाने झाली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थितांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.

यावेळी प्रा. श्रेयस कांबळे व प्रा. करिष्मा मुलाणी यांनी शपथपत्र वाचन करत संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच निर्भय व सत्यशोधक समाज घडविण्याचे आश्वासन दिले. करिष्मा मुलाणी यांनी आभार प्रदर्शन करत ‘तयास मानव म्हणावे का’ ही कविता सादर केली, तर कांबळे कुटुंबीयांनीही काव्यसादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या प्रसंगी पत्रकार विकास शिंदे, पत्रकार जयदीप भगत, ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विजय आमने, लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदांपत्याचे अभिनंदन करत त्यांच्या प्रगत आणि कृतीशील विचारसरणीचे कौतुक केले.

error: Content is protected !!