महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण २६ मे २०२६: बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाणे येथे शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते.बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक उपस्थित होते.
बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध सूचनाही यावेळी देण्यात आल्या.समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरविणारी किंवा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विशाल खांबे यांनी दिला. तसेच कुठेही गोवंश हत्या आढळून आल्यास गोरक्षकांनी स्वतः कारवाई न करता तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून योग्य कारवाई करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणत्याही प्रकारचे चुकीचे संदेश, व्हिडिओ अथवा पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले.बकरी ईद निमित्त तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना चालविण्यासाठी नगरपालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
उघड्यावर जनावरांची कत्तल अथवा अवैध कत्तल आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.यावेळी अॅड. संदीप कांबळे यांनी फलटण शहरातील सीसीटीव्ही फुटेज दुरुस्ती करून घेण्यात यावी तसेच कत्तलखाना परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी केली.
बाणगंगा नदी पात्रात जनावरांच्या कत्तलीनंतर हाडे टाकली जात असल्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी फलटणमधील शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली.
कुरेशी मोहल्ल्यातील नागरिकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून इतर व्यवसायांकडे वळावे, यासाठी समाज प्रबोधन करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली.यावर सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांनी फलटण-कोरेगावचे आमदार, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन समिती स्थापन करण्यात यावी आणि कुरेशी बांधवांसाठी पर्यायी व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. फलटणला ऐतिहासिक परंपरा असून हिंदू-मुस्लिम समाज येथे एकोप्याने राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संबंधितांना BNSS कलम १६८ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या असून परिस्थितीवर पोलीस प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती अरविंद काळे यांनी दिली.

