पाणीसाठा केवळ ४५ दिवस पुरणार; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | फलटण शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनवाहिनी मानला जाणारा नीरा उजवा कालवा बंद करण्यात आल्याने आगामी काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद प्रशासनाने शहरात १८ जून २०२६ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याची तीव्रता कायम असून धरण क्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा नीरा उजवा कालवा १२ जून २०२६ पासून बंद करण्यात आला आहे. हा कालवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने नगरपरिषदेसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सध्या नगरपरिषदेच्या साठवण तलावामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा मर्यादित असून तो अंदाजे ४५ दिवस पुरेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
नगरपरिषदेने सर्व नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. घरगुती वापराव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, वाहन धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे यांसारख्या प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणीपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक
नगरपरिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शहरातील विविध भागांना खालील तारखांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग, पेठ महतपूरा व जितीनाका परिसर :
१८ जून २०२६
२० जून २०२६
२२ जून २०२६
२४ जून २०२६
२६ जून २०२६
२८ जून २०२६
३० जून २०२६
फलटण शहरातील उर्वरित सर्व भाग :
१९ जून २०२६
२१ जून २०२६
२३ जून २०२६
२५ जून २०२६
२७ जून २०२६
२९ जून २०२६
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाणी बचतीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.शहरात आधीच वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढली असताना कालवा बंद झाल्याने आगामी काही आठवडे फलटणकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
पावसाचे आगमन आणि धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईपर्यंत नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

