मध्यरात्री नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर, धोकादायक विद्युत पोलची केली पाहणी; तत्काळ नवीन पोल बसविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

फलटण शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर मंगळवारी मध्यरात्री ११ वाजता अचानक शहरातील विविध भागांच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत असताना नाना पाटील चौक येथील विद्युत पोल तातडीने नव्याने उभारण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार देत तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी संबंधित ठेकेदार यांना सदर सर्व पोल त्वरित हटवून त्याठिकाणी नवीन आणि सुरक्षित विद्युत पोल उभारण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही कामात विलंब अथवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले.यावेळी शहरातील रस्ते व पथदिवे यांची पाहणी केली. विविध भागांतील सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता, कामाचा वेग आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा हे नगरपरिषदेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरात धोकादायक अवस्थेतील विद्युत पोल, झाडे किंवा इतर कोणतीही संरचना असल्यास त्याची माहिती नागरिकांनी नगरपरिषदेला द्यावी. अशा सर्व ठिकाणी तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

नगराध्यक्षांच्या मध्यरात्रीच्या या अचानक पाहणीमुळे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले असून, शहरातील धोकादायक ठिकाणांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण केल्या जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्षांच्या या मध्यरात्रीच्या अचानक पाहणीची शहरात चर्चा रंगली असून, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समस्या जाणून घेत त्वरित निर्णय घेण्याच्या त्यांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

error: Content is protected !!