२४ ऑगस्ट रोजी फलटणमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी साधणार संवाद; पत्रकार परिषदेत ऊस दराचा मुद्दा गाजणार
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : चालू वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य आणि जास्तीत जास्त दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी हे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण येथे येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असून, ऊस दराच्या प्रश्नावर पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे.
राजू शेट्टी हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना मिळणारा दर, साखर उद्योगातील आर्थिक गणित, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि उसाला मिळणारा योग्य मोबदला या प्रमुख विषयांवर ते आपली भूमिका मांडणार आहेत.
फलटण तालुका हा ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, मजुरी, खते, औषधे, सिंचन, वाहतूक यांसह विविध खर्चांचा विचार करून उसाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मांडण्यात येत आहे.
PWD विश्रामगृहात होणार कार्यक्रम
राजू शेट्टी यांची धावती भेट आणि पत्रकार परिषद सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) विश्रामगृहात, फलटण येथे होणार आहे. यावेळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऊस दराबाबत आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिली.
या भेटीत आगामी गळीत हंगामासाठी ऊस दर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कसा केला पाहिजे, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी आणि ऊस दराच्या लढ्याची पुढील दिशा काय असावी, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आवाहन
ऊस दराचा प्रश्न हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नसून संपूर्ण ऊस उत्पादक वर्गाच्या आर्थिक भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
फलटण तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या धावत्या भेटीस आणि पत्रकार परिषदेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
राजू शेट्टी यांच्या फलटण दौऱ्यामुळे आगामी ऊस दराच्या प्रश्नाला पुन्हा एकदा व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या पत्रकार परिषदेत ऊस दराबाबत कोणती भूमिका जाहीर केली जाते, याकडे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजुटीने लढूया; ऊसाला योग्य व जास्तीत जास्त दर मिळालाच पाहिजे,” असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

