दारात, गोठ्यात अन् शिवारात बिबट्याचा वावर; शेळ्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूचशेतकरी भयभीत; वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागासह परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, हा परिसर आता बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे चित्र आहे. घराच्या दारात, गोठ्यात, शिवारात तसेच डोंगरपठारावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून घोटील, मराठवाडी, मत्रेवाडी, डाकेवाडी तसेच डोंगरपठारावरील गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध ठिकाणी बिबट्याने शेळ्यांवर हल्ले करून पशुधन फस्त केल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळीच नव्हे तर सकाळच्या आणि दिवसाच्या वेळीदेखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासही भीती वाटत आहे.
पिंजरा लावूनही बिबट्याची हुलकावणी
डोंगरपठारावरील शिद्रुकवाडी येथे काही महिन्यांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात भक्ष्यदेखील ठेवण्यात आले होते. मात्र, बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावणी देत वनविभागाच्या प्रयत्नांना चकवा दिला. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचे आव्हान कायम आहे.
कराडमध्ये यश, ढेबेवाडीत मात्र प्रतीक्षा
कराड तालुक्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असताना, ढेबेवाडी विभागासह परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही. वारंवार होणारे पशुधनावरील हल्ले आणि वाढता वावर पाहता वनविभागाने अधिक प्रभावी मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून, त्या तुलनेत वनविभागातील मनुष्यबळ अपुरे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे, घटनास्थळी तातडीने पोहोचणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
‘मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का?
’दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत असताना वनविभाग आणखी किती काळ प्रतीक्षा करणार? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो ओळ : मत्रेवाडी येथे सकाळी सातच्या सुमारास बिबट्याने शेळीवर केलेला हल्ला; बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

