महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. संवाद साधताना मातृभाषेचा वापर केल्यास विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतात. मराठी ही महाराष्ट्रातील सुसंवादाची प्रमुख भाषा असून तिची व्याप्ती वाढली तर समाजातील संवाद अधिक सक्षम होईल. मात्र महाराष्ट्रात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्या बोलीभाषा आणि स्थानिक भाषांचा विकास झाल्याशिवाय मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. बोलीभाषांमध्येच मराठी भाषेचा खरा विकास दडलेला आहे, असा सामूहिक सूर फलटण येथील नाना-नानी पार्क येथे झालेल्या ३६ व्या साहित्य संवाद कार्यक्रमात उमटला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, रवींद्र येवले, विक्रम आपटे, आशा दळवी, सुरेश भगत, विनायक ननावरे, सुधीर इंगळे, विजया सुरवसे, राजाकुमार काकडे, प्रा. डॉ. अशोक शिंदे, संगीता वाघमारे, शुभांगी पुजारी, भारती जगदाळे, रोहिणी भंडलकर, हरिभाऊ जाधव, बबनराव जाधव, आप्पासाहेब तांबे, करिष्मा मुलानी, नरेंद्र वाघमारे, सचिन भांडवलकर, अमोल जाधव, विक्रम भांडवलकर, प्रा. श्रेयस कांबळे यांच्यासह अनेक साहित्यिक व कवी उपस्थित होते.

या वेळी फलटण तालुक्यातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींचा सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रेयस कांबळे यांनी मानले.
साहित्य संवाद…
फलटणमधील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक दर महिन्याच्या २७ तारखेला नाना-नानी पार्क येथे एकत्र येऊन ठरावीक विषयावर साहित्यिक संवाद साधतात. रानकवी राहुल निकम, प्रा. विकास शिंदे आणि ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी एकत्र येऊन साहित्य संवाद या उपक्रमाची स्थापना केली. गेली तीन वर्षे हा संवाद अविरतपणे सुरू असून त्यातून साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळाले आहे.
साहित्य संवादच्या लेखकांची प्रकाशने…
साहित्य संवाद या उपक्रमात फलटण तालुक्यातील ६० ते ६५ साहित्यिकांचा सहभाग आहे. या साहित्यिकांनी गेल्या तीन वर्षांत ३० ते ३५ पुस्तकांचे प्रकाशन केले असून हीच साहित्य संवाद उपक्रमाची मोठी उपलब्धी मानली जात आहे.
साहित्यिकांचे मत
“मराठी भाषेवर कितीही भाषांचे आक्रमण झाले तरी मराठीचे अस्तित्व कोणीही पुसू शकत नाही. नव्या पिढीतून मराठीसाठी काम करणारे लेखक तयार होत आहेत. मराठी साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले तर ते जगभर पोहोचेल आणि मराठीचा अभिजात दर्जा अधिक उंचावेल.”— ताराचंद्र आवळे, माणदेशी साहित्यिक
“मराठी साहित्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही संस्था आज मजबूत होत आहे. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना यामधून मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यामुळेच गेली तीन वर्षे साहित्य संवाद सातत्याने सुरू आहे.”— प्रा. विकास शिंदे, संस्थापक संयोजक
“मराठीतील अनेक पुस्तकांचे इंग्रजीत अनुवाद झाले पाहिजेत. त्याचबरोबर बोलीभाषांचा विकासही आवश्यक आहे. ज्या गतीने इंग्रजी साहित्य मराठीत येते, त्याच गतीने मराठी साहित्य इंग्रजीत गेले पाहिजे.”— प्रा. विक्रम आपटे, अनुवादक व साहित्यिक
“मराठी भाषेत इतर भाषांतील शब्द येणे ही सामाजिक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाषांमधील शब्दांचे परस्पर समावेशीकरण हे भाषेच्या विकासाचे लक्षण आहे आणि ते नैसर्गिकपणे घडू द्यावे.”— प्रा. रवींद्र येवले, माजी अध्यक्ष, साहित्य परिषद फलटण

