महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या (शासकीय, निमशासकीय व खाजगी) प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या तालुक्यांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून सखल भागात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा धोकादायक ठरू शकते. तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. संबंधित सर्व शाळा प्रशासनाने आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

