महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी: शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी माऊली फाउंडेशन आणि पोस्ट ऑफिस फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड संदर्भातील विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनिवार, दिनांक २ मे रोजी सकाळी १० वाजता लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात हे शिबिर पार पडणार आहे.
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, बँक व्यवहार तसेच विविध सेवांसाठी आधार कार्ड आवश्यक ठरत असल्यामुळे अनेक नागरिकांना वेळेअभावी किंवा प्रक्रियेतील अडचणींमुळे आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करता येत नाही. हीच गरज ओळखून माऊली फाउंडेशन आणि पोस्ट ऑफिस फलटण यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
या शिबिरामध्ये विशेषतः ६ महिन्यांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत आधार कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नवजात बालकांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना आधार नोंदणी सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर आधीपासून आधार कार्ड असलेल्या नागरिकांसाठी जन्मतारीख, नाव, पत्ता, फोटो आदी तपशीलांमध्ये आवश्यक बदल आणि दुरुस्तीची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.
या शिबिरासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचीही तयारी करण्यात आली असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.नगरसेविका सिद्धाली शहा यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक बनले आहे.
अनेक नागरिकांना लहानसहान कारणांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा शिबिरांमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच सोयीस्कर सेवा मिळते.”त्यामुळे फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यातही लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

