महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी :- फलटण शहर व तालुक्यातील शासकीय जागांवर बांधकाम केलेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 500 ते 1500 चौरस फुटांपर्यंतची फक्त निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे.
पंचायत समिती फलटण येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीस आमदार सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले तसेच विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा स्तरावर आढावा समिती गठीत करण्यात येणार असून तिचे अध्यक्षस्थान आमदार सचिन पाटील यांच्याकडे राहणार आहे.
अतिक्रमण नियमित करण्यासाठी संबंधित आमदारांची शिफारस आवश्यक राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाला खाजगी मोजणीदारांमार्फत तातडीने मोजणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही योजना पारदर्शक, निपक्षपाती व प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
फलटण तालुक्यातील एकही पात्र घर या योजनेपासून वंचित राहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही ठिकाणी अतिक्रमण केलेली घरे इतरांना देऊन स्वतः वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींवर काटेकोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले.आमदार सचिन पाटील यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने काम करून नागरिकांना योग्य न्याय द्यावा, अशी सूचना केली.
अतिक्रमण नियमित करताना कोणतीही अनियमितता होऊ नये याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.फलटण शहरातील ओपन स्पेसबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरातील सर्व खुल्या जागांची भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून त्या नगरपालिकेच्या नावावर नोंदविण्यात येणार असून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी महसूल, भूमी अभिलेख आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले.दरम्यान, पंचायत समितीतील कामकाजाबाबत काही तक्रारींची दखल घेत माजी खासदारांनी संबंधितांना सूचना देत शिस्त राखण्याचे आदेश दिले.
प्रलंबित कामे पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी महसूल विभागाकडून आवश्यक सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.या बैठकीस विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

