6 मे 2026 – महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क – फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात मळी माफियाकडून मळीच्या (डिस्टिलरी वेस्ट) बेकायदेशीर विल्हेवाटीमुळे शेती नापीक होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे मळी आणून शेतांमध्ये टाकली जात असल्याने जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात घटली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
मळीमधील रासायनिक घटक व क्षारांच्या अतिरेकामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, पिकांची वाढ खुंटत आहे. ऊस, ज्वारी, बाजरी यांसारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन घटले आहे. काही ठिकाणी तर जमीन पूर्णपणे नापीक बनल्याने गवतसुद्धा उगवत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊन आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मळी माफिया रात्रीच्या वेळी टँकरद्वारे मळी आणून शेतांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये सोडली जाते. ही वाहतूक कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय होत असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित विभागांचे दुर्लक्ष असल्याची टीका होत आहे.
मळीमुळे केवळ शेतीच नव्हे तर पाण्याचे स्रोतही प्रदूषित होत आहेत. विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचा रंग व वास बदलल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे पाणी पिण्यास अयोग्य ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बेकायदेशीर मळी टाकणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच मुळी माफियांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने तात्काळ पाहणी करून मुळी माफियांकडून मळीची बेकायदेशीर वाहतूक व विल्हेवाट थांबवावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. “वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
मळी शेतात टाकण्याचे दुष्परिणाम:
मातीचे आरोग्य खराब: मळीमध्ये उच्च उष्णता आणि आम्लारी (Acidic) गुणधर्म असतात, ज्यामुळे जमिनीचा सामू (pH) बिघडतो आणि माती नापीक होते.
जलप्रदूषण: शेतात टाकलेली मळी पावसाळयात वाहून विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये जाते, ज्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते.
पिकांचे नुकसान: अति उष्णतेमुळे पिकांची मुळे जळतात आणि पीक वाढीवर परिणाम होतो.
कायदेशीर कारवाई: ही कृती धोकादायक असल्याने बऱ्याच ठिकाणी प्रशासनाकडून यावर मनाई आहे.

