महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
सातारा प्रतिनिधी : वाई तालुक्यात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज वाई येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजय संकपाळ यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत माहिती दिली.
वाईमध्ये भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रणित मोरे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे. वाईच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
तसेच सोनाली मिटकरी यांचे पती राम शिंदे हे वाई येथे पशुवैद्यकीय अधिकारी असून, पाटबंधारे विभागाच्या जागेवर त्यांनी कथितरित्या अनधिकृत बंगला बांधल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या बंगल्याचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत संबंधित बांधकामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय वाई तालुक्यातील उत्खनन परवानग्या, महसूल नोंदी आणि इतर प्रशासकीय कारभाराचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.यापूर्वी प्रांताधिकारी खरमाटे यांच्या माध्यमातून प्रशासनाशी चर्चा झाली. मात्र, चर्चेतून समाधानकारक मार्ग न निघाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मिळवण्यासाठी शिष्टमंडळ आले असल्याचे अजय संकपाळ यांनी सांगितले.
“केवळ चौकशीचे आश्वासन नको, दोषी आढळल्यास कठोर कारवाई हवी. न्याय मिळेपर्यंत वाईतील बेमुदत उपोषण सुरूच राहणार,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.आंदोलकांनी संबंधित तहसीलदार व त्यांच्या पतीच्या कारभाराची चौकशी करून, दोष आढळल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

