महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : शहरातील साईनगर फिडरवर वाढलेल्या अतिरिक्त भारामुळे फलटण शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः कडक उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिकच तीव्र बनली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विडणी गावाला मूळतः बरड सब स्टेशनमधून वीजपुरवठा होणे अपेक्षित असताना, सध्या तो नियमबाह्य पद्धतीने फलटण सब स्टेशनअंतर्गत साईनगर फिडरवरून जोडण्यात आला आहे. या अनधिकृत जोडणीमुळे साईनगर फिडरवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम फलटण शहरातील वीजपुरवठ्यावर होत आहे.
या वाढलेल्या लोडमुळे शहरातील विविध भागांमध्ये वारंवार लाईट जाणे, कमी व्होल्टेज, तसेच अचानक वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक आस्थापनांनाही याचा मोठा फटका बसत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक आधीच हैराण झालेले असताना वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
नागरिकांकडून असा आरोप करण्यात येत आहे की, संबंधित महावितरण विभागीय कार्यालयाने योग्य नियोजन न करता व नियमांकडे दुर्लक्ष करून ही जोडणी केली आहे. त्यामुळे शहरातील वीज वितरण यंत्रणेवर अनावश्यक ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, विडणी गावासाठी साईनगर फिडरवरून दिलेला वीजपुरवठा तात्काळ बंद करून तो पुन्हा बरड सब स्टेशनमधूनच सुरू करण्यात यावा. तसेच शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, महावितरण प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

