महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण :- फलटण तालुक्यातील गोखळी येथे शाहिद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “१३५ ग्रंथ भेट” कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे उपस्थित होते.यावेळी बोलताना आवळे म्हणाले, “वाचनाने माणसाच्या मनाची मशागत होते.” जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस काहीतरी नवीन शिकत असतो आणि हेच शिक्षण त्याला ध्येयाकडे घेऊन जाते.
ध्येय साध्य करण्यासाठी वाचन, मनन, चिंतन आणि आत्मपरीक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी माणसे आणि पुस्तके वाचणे गरजेचे आहे, असे सांगताना त्यांनी पुस्तके जगण्याची दिशा देतात, तर माणसे जगायला शिकवतात, असे मत व्यक्त केले. “पुस्तक वाचनाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नाही,” असेही ते म्हणाले.
आजच्या पिढीला मोबाईलच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले. “वाचाल तर वाचाल” हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलमधील रिल्समुळे जीवन क्षणभंगुर होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ. ऋतुजा जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते आबा मदने यांनीही वाचनाचे महत्त्व पटवून दिले. शाहीर प्रमोद जगताप आणि सतीश झेंडे यांनी समाजप्रबोधनपर कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी ताराचंद्र आवळे यांनी वाचनालयास १३५ पुस्तके भेट दिली. या पुस्तकांमध्ये कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र, आत्मचरित्र तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त साहित्याचा समावेश आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश भागवत यांनी केले, तर सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले.
यावेळी सरपंच रमेश गावडे, अमोल हरिहर, बबलू शिरतोडे, मयूर गावडे, श्रीकांत माने तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी वाचनालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

